बोईसर : पालघर तालुक्यातील
चिंचारे येथील दोन युवकांचा बोईसर - चिल्हार महामार्गावर पुलाच्या कठड्याला धडकून अपघात झाल्याने या अपघातात दोन्ही युवकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने चिंचारे गावावर शोककळा

पसरली आहे. बोईसर - चिल्हार मार्गावरील

सूर्या नदीच्या पुलावर तालुक्यातील चिंचारे गावातील दोघा तरुणांचा पुलाच्या कठड्याला धडकून सोमवारी साडेचार वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला होता.

यावेळी त्यांना नजीकच्या अधिकारी लाइफलाइन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी सदर घटनेची नोंद बोईसर पोलीस दप्तरी करण्यात आली असून, पोलीस अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

प्रमोद वावरे (वय ३२) व विकास गोलिम (वय २७) अशी मृत तरुणांची नावे असून, ते दोघेही एकाच गावातील राहणारे होते. प्रमोद वावरे यांच्या पत्नी विद्यमान सरपंच असून, त्यांना एक मुलगा असा परिवार आहे, तर विकास गोलिम हे अविवाहित होते. अतिशय शोकाकुल वातावरणात या दोन तरुणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.